बालोपासना

ॐ नम: शिवाय
बाळगोपाळांस सूचना

बाळगोपाळांनो! रोज़ सकाळी अंघोळ झाली की तुम्ही या बालोपासनेतिल प्रार्थना म्हणा, म्हणजे तुमचे मन अत्यंत उत्साही बनेल. त्यावर जर शाळेतील अभ्यास केला तर तो पूर्ण तुमच्या लक्षात राहिल आणि तुम्ही परीक्षेत नक्की पास व्हाल.मात्र प्रार्थना दररोज व नियमित केली पाहिजे. वडील माणसांच्या धाकने कपाळाला आठ्या घालून प्राथना केल्यास ती देवाला आवडणार नाही हं! तुमच्यासाठी आईने खाऊ समोर ठेवला असता तो कधी खाईन, कधी खाईन असे तुम्हाला होत असते ना? त्याप्रमाणे देवाची प्रार्थना कधी करीन, कधी करीन असे तुम्हाला वाटले पाहिजे. म्हणजेच देवाचा आशीर्वाद मिळून मोठेपणी सुद्धा प्रत्येक कामात तुम्ही यशस्वी व्हाल. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रसंगी आनंदी राहू शकाल.

balopasana,balopasanaa,balopasana marathi,kalawati mata balopasana,balopasana om namah shivay,balopasana shree kalawati aai,#kalavatiaai #balopasana,kalavati,bhajan,kalavati aai,bal sanskar,kalavati aai (in marathi),baal sanskaar,parma pujya:balopasna,dattatreya,shubdha patankar,kalawati mata balopasana:aai,manache shlok,bal sanskar marathi,prasad padit,kalavat mata,kalavati maya,#kalavatiaai,kalawati,kalavati matta

परमपूज्य आई श्रीकलावतीदेवी  

* बालोपासना *

श्री गणपते | विघ्ननाशना|
मंगलमूरुते | मूषकवाहना |१|
तिमिर नाशिसी | निजज्ञान देउनि|
रक्षिसी सदा | सुभक्तांलागुनि |२|
खड्ग दे मला | प्रेमरूपी हे|
मारिन षड़रिपु | दुष्ट दैत्य हे |३|
बालकापरी | जवळी घे मज|
ईश जगाचा तू | मी तव पदरज |४|
मनोहर तुझी | मूर्ति पहावया|
लागी दिव्य दुष्टि | देई मोरया |५|
पुरवि हेतुला | करुनि करुणा|
रमवी भजनी | कलिमलदहना |६|

आनंदलहरी

ज्ञानभास्करा शांतिसागरा, भक्तमनहरा मुकुंदा | परम उदारा भवभयहरा, रखमाईवरा सुखकंदा ||
पाप ताप दुरितादि हराया, तूचि समर्थ यदुराया | म्हणोनि तुजसी एकोभावे, शरण मी आलो यदुराया ||
कंठी निशिदिनी नाम वसो, चित्ती अखंड प्रेम ठसो | श्यामसुंदरा सर्वकाळ मज, तुझे सगुण रूप दिसो ||
तू माउली मी लेकरू देवा, तू स्वामी मी चाकरू | मी पान तू तरुवरु देवा, तू धेनु मी वासरू ||
तू पावन मी पतित देवा, तू दाता मी याचक | तू फूल मी सुवास देवा, तू मालक मी सेवक ||
तू गूळ मी गोडी देवा, तू धनुष्य मी बाण | तू डोंगर मी चारा देवा, तू चंदन मी सहाण ||
तू चंद्रमा मी चकोर देवा, मी कला तू पौर्णिमा | तुझ्या वर्णनासी नाही सीमा, असा अगाध तुझा महिमा ||
तू जल मी बर्फ देवा, तु सागर मी लहरी | तुजविण क्षण मज युगसम वाटो, हेचि मागणे श्रीहरि ||
वत्सा गाय बाळा माय, तेवी मजला तू आई | काया वाचा मने सदोदित, तव पदी सेवा मज देई ||
ध्यास नसोंदे विषयांचा मज, तुझ्या पायी मन सतत रमो | दृढतरभावे तव गुण गाता, कोठे माझे मन न गमो|
अनंतरूपा एकोभावे, करितो अनंत नमस्कार | दासपणाचे सुखसोहळे, भोगवी प्रभो निरंतर |
नको मजवरि राहू उदास धावत येई यदुराया | तव दर्शनेविण दुजी न आस, धावत येई यदुराया ||

नारायणाष्टक

नारायणा हे नारायणा | नारायणा हे नारायणा | नारायणा हे नारायणा | नारायणा हे नारायणा |धृ|
जगादिस्तंभा नारायणा | लक्ष्मीवल्लभा नारायणा | कमलनाभा नारायणा | नारायणा हे नारायणा |१|
देवकीनंदना नारायणा | गोपीजीवाना नारायणा | कालियामर्दना नारायणा | नारायणा हे नारायणा |२|
सुहास्यवदना नारायणा | राजीवलोचना नारायणा | मदनामोहना नारायणा | नारायणा हे नारायणा |३|
जगज्जनका नारायणा | जगतपालका नारायणा | जगन्निवासका नारायणा | नारायणा हे नारायणा |४|
पतितपावना नारायणा | पीतवसना नारायणा | शेषशयना नारायणा | नारायणा हे नारायणा |५|
त्रिगुणातीता नारायणा | षड्गुणवंता नारायणा | वसुदेवसुता नारायणा | नारायणा हे नारायणा |६|
सुरनरवंदना नारायणा | असुरकंदना नारायणा | नित्यनिरंजना नारायणा | नारायणा हे नारायणा |७|
यदुकुलभूषणा नारायणा | भवसिंधुतारणा नारायणा | कलिमलहरणा नारायणा | नारायणा हे नारायणा |८|

चोवीस नामावळी

केशवा, दे मजला विसावा | आलो शरण तुला |१|
नारायणा, करी मजवरी करूणा | आलो शरण तुला |२|
माधवा, चैन पडेना जीवा | आलो शरण तुला |३|
गोविंदा, दे तव नाम छंदा | आलो शरण तुला |४|
श्रीविष्णु, मी वत्स तू धेनु | आलो शरण तुला |५|
मधुसूदना, वारि चित्तवेदना | आलो शरण तुला |६|
त्रिविक्रमा, अगाध तुझा महिमा | आलो शरण तुला |७|
वामना, पुरवी मनकामना | आलो शरण तुला |८|
श्रीधरा, तुजविण नको पसारा | आलो शरण तुला |९|
हृषिकेशा, तोडी वेगी भवपाशा | आलो शरण तुला |१०|
पद्मनाभा, जगताचा तू गाभा | आलो शरण तुला |११|
दामोदरा, चरणी देई थारा | आलो शरण तुला |१२|
संकर्षणा, तू त्रैलोक्याचा राणा | आलो शरण तुला |१३|
वासुदेवा, सतत देई मज सेवा | आलो शरण तुला |१४|
प्रद्यम्ना, न पाहि तुजविण आना | आलो शरण तुला |१५|
अनिरुद्धा, दे प्रेम भक्ति श्रद्धा | आलो शरण तुला |१६|
पुरुषोत्तमा, भजनी दे मज प्रेमा | आलो शरण तुला |१७|
अधोक्षजा, सत्य सखा तू माझा | आलो शरण तुला |१८|
नरसिंहा, कृपा करिसि तू केव्हां | आलो शरण तुला |१९|
अच्युता, तुजविण नाही त्राता | आलो शरण तुला |२०|
जनार्दना, घे पदरी या दिना | आलो शरण तुला |२१|
उपेंद्रा, घालवि आळस-निद्रा | आलो शरण तुला |२२|
श्रीहरि, जन्ममरणाते वारी | आलो शरण तुला |२३|
श्रीकृष्णा, घालवि माझी तृष्णा | आलो शरण तुला |२४|
निरंजना, रुक्मिणीच्या जीवना | आलो शरण तुला |२५|

गुरुपादुकाष्टक

दयावंत कृपावंत सद्गुरुराया | अनन्यभावे शरण आलो मी पाया | भवभ्रमातुनि काढी त्वरे या दीनासी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |१|
अनंत अपराधी मी सत्य आहे | म्हणोनि तुझा दास होऊ इच्छिताहे | तुजविण हे दुःख सांगू कुणासी |नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |२|
मतिहीन परदेशी मी एक आहे | तुजविण जगी कोणी प्रेमे न पाहे | जननी जनक इष्ट बंधु तू मजसी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |३|
जगतपसारा दिसो सर्व वाव | अखंडीत तव पायी मज देई ठाव | विषापरि विषय वाटो मनासी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |४|
तव आज्ञेसी पाळील जो एकभावे | तयासीच तू भेट देसी स्वभावे | म्हणोनि अनन्यशरण आलो मी तुजसी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |५|
किती दिवस गाऊ हे संसारगाणे | तुजविण कोण हे चुकविल पेणे | नको दूर लोटू चरणी थारा दे मजसी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |६|
सुवार्णासी सोडुनी कांति न राही | सुमनासी न सोडी सुवास पाही| तैसा मी राहीन निरंतर तुझ्या सेवेसी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |७|
कलावंत भगवंत अनंत देवा | मनकामना पुरवि दे अखंड तव भक्तिमेवा | कृपा करोनि मज ठेवी स्वदेशी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |८|

यदुवीराष्टक

नमन करितो अनंता | सुमन वाहतो श्रीकांता | ठेवितो चरणावरी माथा | जय जय यदुवीर समर्था |१|
त्रयभुवनाचा तू कंद | अससी सत-चित-आनंद | परि सगुण होउनि रमविसि भक्तां |जय जय यदुवीर समर्था |२|
देवकीने तुज वाहिले | नंदराणीने पाळिले | तोषविली गोकुळिची जनता | जय जय यदुवीर समर्था |३|
पुतनेचे विष शोषियेले | अघ-बक असुरा मारियले | करांगुळी गोवर्धन धरिता | जय जय यदुवीर समर्था |४|
कलियावरी नाचसी | मंजुळ मुरली वाजविसी | यमुनातीरी धेनु चारिता | जय जय यदुवीर समर्था |५|
गोपीसवे रास खेळसी | अक्रुरासह मथुरे जासी | गज आपटिला भूमिवरुता | जय जय यदुवीर समर्था |६|
कंसाचे केले कंदन | राज्यी स्थापिला उग्रसेन| सुख विलेसी तात-माता | जय जय यदुवीर समर्था |७|
गुरूगृही काष्टे वाहिली | विप्रा सुवर्णपुरी दिधलि | भक्तांची कामना पुरविता | जय जय यदुवीर समर्था |८|
अर्जुनासी कथिलि गीता | ती झाली सकलां माता | बोधने कलिमल हरिता | जय जय यदुवीर समर्था |९|

पूजा

गिरिधर मी पूजणार आजी | यदुवीर मी पूजणार |धृ.|
रत्नजडित सिंहासनी बसवुनी | झारीत घेउनि गुलाबपाणी || प्रभुरायाचे मुख न्याहाळोनि | स्वकरे पाय धुणार |१|
चंदनउटि लावुनि अंगाला | नेसवुनी पीतांबर पिवळा || अंगावरि भरजरी लाल शेला | पांघराया देणार |२|
जाई जुई मोगरा मालती | चाफा बकुळी सुगंधि शेवंती || दवणा मरवा तुळस वैजयंती | गुंफुनि हार करणार |३|
कपाळी लावुनि कस्तुरिटिळा | सुमनहार घालुनि गळां || हास्यवदन घनश्याम सांवळा | डोळेभर पहाणार |४|
धूप घालुनि दीप लाविन | दूधफळाते प्रेमे अर्पिन || मंगलारती ओवाळून | प्रभुचे गुण गाणार |५|
परमपावना रुक्मिणीजीवना | निशिदिनी करी रत तव गुणगाना || ऐसे भावे करुनि प्रार्थना | पदी मस्तक ठेवणार |६|

तव भक्तिलागी तनु ही झिजू दे | तव चरणकमली मन हे निजू दे |
तव स्मरणी ठेवी ही वाचा रिझाया | नमस्कार माझा तुला यदुराया ||

आरती

(1)

जय जय कृष्णनाथा | तिन्ही लोकींच्या ताता |
आरती ओवाळीता | हरली घोर भवचिंता |धृ.||
धन्य ते गोकुळ हो, जेथे करी कृष्ण लीला |
धन्य ती देवकीमाता, कृष्ण नवमास वाहिला |
धन्य तो वसुदेव, कृष्ण गुप्तपणे रक्षिला ||
धन्य ती यमुनाई, कृष्णपदी ठेवी माथा |१|
धन्य ती नंदयशोदा, ज्यांनी प्रभु खेळविला |
धन्य ते बाळगोपाळ, कृष्ण देई दहीकाला |
धन्य ते गोपगोपी, भोगिति सुखसोहळा ||
धन्य त्या राधा-रुक्मिणी, कृष्णप्रेमसरिता |२|

(2)

ओवाळू आरती माता कलावती | पाहता तुझी मूर्ति मनकामनापुर्ती |धृ.|
भावे वंदिता तव दिव्य पाउले | संसारापासुनि माझे मन भंगले ||
तुझ्या भजनी नित चित्त रंगले | झाली ह्रत्तापाची पूर्ण शांति |१|
गौरवर्ण तनुवरि शोभे शुभ्र अंबर | दर्शनमात्रे लाभे आनंद थोर ||
भाषणे सकल संशय जाती दूर | विशालाक्ष मज दे गुणवंती |२|

विज्ञापना

हे विश्वजनका, विश्वंभरा, विश्वपालका, विश्वेश्वरा !
माझ्या मनाची चंचलता दूर कर.

हे सर्वव्यापी, सर्वसाक्षी, सर्वोत्तमा, सर्वज्ञा !
तुला ओळखण्याचे मला ज्ञान दे .

हे प्रेमसागरा, प्रेमानंदा, प्रेममूर्ते, प्रेमरूपा !
माझे दुर्गुण नाहीसे करून शुद्ध प्रेमाने हृदय भरू दे.

हे ज्ञानेशा, ज्ञानमुर्ते, ज्ञानांजना, ज्ञानज्योति !
तुझ्या चरणी माझी श्रद्धा, भक्ती द्रुढ कर.

हे मायातीता, मायबापा, मायाचालका, मायामोहहरणा !
समदृष्टी आणि अढळ शांति मला दे .

हे कमलनयना, कमलाकांता, कमलानाथा, कमलाधीशा !
माझ्या नेत्रांना सर्व स्थावर-जंगमात तुझे दर्शन घडू दे .
माझे कान तुझे कीर्तन श्रवण करू देत.

हे पतितपावना, परमेशा, परमानंदा, परमप्रिया !
माझ्या हस्ताने तुझी पूजा घडू दे.
तुझ्याभोवती माझे पाय प्रदक्षिणा घालू देत.

हे गुरुनाथा, गुरुमूर्ते, गुरुराजा, गुरुदेवा !
माझे मन निरंतर तुझे ध्यान करू दे.
तुझ्या चरणकमली मला अखंड थारा दे.

||श्री गोपालकृष्ण महाराज की जय ||


| श्री सिद्धारूढ स्वामी की जय |
| परमपूज्य श्री कलावती माता की जय |
| श्री सदगुरु महाराज की जय |

Comments

  1. Lockdown संपून भजन लवकर सुरु हुवूदेत हिच प्रार्थना आईंच्याकडे.

    ReplyDelete
  2. Khup chhan...🙏🙏🙏
    !!Om namah shivay !!

    ReplyDelete
  3. ।।ओम नमः शिवाय।।
    बाल़ोपासना ऑनलाईन केल्यामुळे प्रार्थनेच्या वेळी पुस्तक सहज उपलब्ध झाले याचा खुप आनंद झाला.
    परमपूज्य गुरूदेवता कलावती आई माते की जय
    श्री सिद्धारुढ बाबा महाराज की जय
    ।। ओम नमः शिवाय ।।

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

नित्योपासना - सोमवार - प्रातः स्मरण

नित्योपासना - मंगलवार - प्रातः स्मरण