नित्योपासना - सोमवार - सायं स्मरण
ॐ नम: शिवाय
परमपूज्य आई श्रीकलावतीदेवी |
भजन - सदगुरुनाथे माझे आई । मजला ठाव द्यावा पायी ॥
१) श्रीशिवगौरीप्रियनंदना । पूर्ण करीं मनकामना ॥धृ०॥चौदेहाच्या चौरंगी बसवुनि । पूजिन तुज विघ्नविनाशना ॥१॥
अनन्यभक्तिजले स्नान घालुनि । चरणी वाहीन सुमना ॥२॥
वासनाशेंदूर अंगा लावीन । धूप अहंभावना ॥३॥
रजोगुणात्मक लाल पीतांबर । नेसविन मूषकवाहना ॥४॥
पंचविषय ह्या दूर्वा तुज म्या । अर्पिन सुरनरवंदना ॥५॥
नंदादीप अखंड ध्यानाचा । कर्पूर समूळ दुर्भावना ॥६॥
सुप्रेमाचा मोदक भक्षी । सत्वरि कलिमलदहना ॥७॥
भजन - पार्वतीच्या नंदना मोरया, गजानना गजवदना ॥
२) सुंदरे गुणमंदिरे करुणाकरे कमलोदभवे । सिध्दचारणपूजिते जनवंदिते महावैष्णवे ।त्राहि वो मज, त्राहि वो मज पाहि वो महालक्षुमी । हेमबावन रत्नकोंदन ते सिंहासन आसनी ॥१॥
एक एक विचित्र माणिक जोडिले मुगुटावरी । त्यासी देखुनि लोपला शशी चालिला गगनोदरी ।
कुंडले श्रवणी रविशशी - मंडलासह वर्तुळे । बोलता सुरनायकावरी हालताती चंचळे ॥२॥
कंचुकी कुचमंडलावरी हार चंपक रुळती । पारिजातक शेवंती बटमोगरा आणि मालती ।
पिवळा पट तो कटितटि वेष्टिला बरवे परी । सौदामिनिहुनि तेज अधिक शोभते उदरावरी ॥३॥
कामुकावरी मन्मथेश्वर सज्जिले तैशां निर्या । गर्जति पदपंकजे किती नूपुरे आणि घागर्या ।
इंद्र चंद्र महेंद्र नारद पादपंकज अर्चिती । कुंकुमागरु कस्तुरी प्रीति आदरे तुज चर्चिती ॥४॥
निर्जरे तुज पूजिले बहु शोभसी कमलासनी । किती हो तुज वर्णु मी मज पाव गे कुलस्वामिनी ।
कोटि तेहतीस देवता सह घेउनि विंझण करी। चामरे चिरपल्लवे तुज ढाळिती परमेश्वरी ॥५॥
नामामृत दे निरंतर याचकाप्रति गिरिसुते। जोडुनि कर विनवितो तुज पाव गे वरदेवते ।
संकटी तुजवाचुनि मज कोण रक्षिल अंबिके। गोसावीनंदन प्रार्थितो तुज पाव गे जगदंबिके ॥६॥
भजन - आनंदे गुरुमाय । निजानंदे गुरुमाय । सच्चिदानंदे गुरुमाय । पूर्णानंदे गुरुमाय ॥
३) संतदर्शने महालाभ जाहला ।ह्रदयगृही आनंदकंद पाहिला ॥धृ०॥
मी माझे म्हणुनि भ्रमे फिरत होतो भारी । दैवयोगे पातलो संतमहाद्वारी ॥१॥
सापडुनि होतो गौडबंगाल जाली । सदय संतमायबापे मोकळीक केली ॥२॥
बहुत जन्मार्जित भाग्य उदया आले । संतकृपे आजि माझे निजरुप समजले ॥३॥
भ्रमर सुवासासि लुब्ध मक्षिका मधासि । तेचि चित्त गोवियेले आत्मह्रषीकेशी ॥४॥
अणुरेणुपासुनि विश्वि कृष्ण संचला । भक्तकामकल्पतरु दास मनी राहिला ॥५॥
भजन - शांत किती हा सदगुरुमूर्ति । पाहता मावळे द्वैतभ्रांति ॥
४) गुरुने अमल पिलायाजी । मुझकु गरक सुलायाजी ॥धृ०॥आगम निगमकी बुट्टी गहिरा गुरुबचनका पानी । मनकुंडीमे खूब घोंटकर आत्मग्यानसे छानी ॥१॥
नैन अगोचर मुद्रा चढकर उलटा महल देखो । व्हांके अंदर मूरत बैठी रुप नही वा रेखो ॥२॥
निरंजन रघुनाथगुरुने एकहि बात सुनाई । मेरा चेहरा मुझे बताया आपोआप भुलाई ॥३॥
भजन - सीताराम जय जय राम । हरेराम, राम, राम, राम॥
५)ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय वद, वद, वद रे ।पावशी सच्चिदानंदपद रे । मनुजा ॥धृ०॥
लक्षचौर्यांशी योनी फिरता । अवचित नरतनु आली हाता ।
पुनरपि न मिळे ही जाणुनि ताता । गुरुसी वरी होउनि सदगद रे ॥१॥
विषय विषापरि वाटता तुज । गुरुपदी अनन्य होशी सहज । गुरुकृपेने कळता निजगुज । तरशिल भवसागर दुःखद रे ॥२॥
वेदशास्त्रे पुराणादिक । आणिक संत सनकादिक । गुरुविण गति नाही म्हणती सकळिक । गुरुवचने रुक्मिणी सावध रे ॥३॥
भजन - उपेंद्रा भक्तचकोरचंद्रा । सत्वरि धाव बा ॥
६)आरुढ, सत्पदारुढ, तमोमय मूढ जगी जन भरला,त्या मुक्त कराया, सांबचि जऊ अवतरला ॥धृ०॥
जरि रोड आकृति गोड, पाहता कोड, पुरति नेत्रांचे ।
तदभाषण वाटे सार ब्रह्मसूत्राचे ॥
मनि शांति, मुखावरि कांति, घालवी भ्रांति प्रणत लोकांची ।
या अल्पमुखे मी स्तुति करु केवी त्यांची । चाल ।
कुणी म्हणती जातीने वाणी, त्याजला ।
कुणी म्हणती कोष्टिकुलवंशी जन्मला ।
परि अधिक द्विजाहुनि वाटे तो मंला ।
समदृष्टि, सदासंतुष्टि, असो तो कोष्टि, विप्र की वाणी ।
तो वंद्यचि मजला, चिद्रत्नांची खाणी ॥१॥
बहु दिवस असा सहवास, कराया नवस चित्त करी माझे ।
तो योग आणिला सहजचि सदगुरुराजे ।
संगति ज्याचि सदगति, देउनि मति, शुद्ध करी खासी ।
तो राहुनि येथे, हुबळीची करी काशी चाल ।
असतील शेकडो ज्ञानी, महिवरी ।
मुक्तचि झाले स्वज्ञाने ते जरि ।
उपकारी क्वचितचि असतील यापरि ।
शिशुपरी खेळ कुणि करी, वदत वैखरी, पिशापरि कोणी ।
कुणि बसति मुक्यापरि, स्तंभुनि आपुली वाणी ॥२॥
ही माय दुभति गाय, वंदिता पाय, ज्ञानपय देई ।
गुण अंग जातिकुळ काळवेळ नच पाही ।
जन भरति ऐकुनि कीर्ति, पहाया मूर्ति रथावरि ज्याची ।
दरवर्षी भरे ती जत्रा कशी मौजेची ।
चाल । प्रार्थना जनांनो तुम्ही आईका ।
हा कल्पतरु तुम्हाला लाभला फुका ।
ही संधि वाया जाऊ देऊ नका ।
जा शरण, धरा तच्चरण, व्हावया तरण, भवांबुधिमाजि ।
ही कृष्णसुताची, विनंति ऐकुनि घ्याजि ॥३॥
भजन -ॐ नमः शिवाय, तरणोपाय, सुलभ उपाय, तारकमंत्र गुरुंचा ॥
७) मै गुलाम मै गुलाम मै गुलाम तेरा ।तू साहेब मेरा सच्चा नाम लेऊं तेरा ॥धृ०॥
रुप नही रंग नही नही बरन छाया
निर्विकार निर्गुन तू एक रघुराया ॥१॥
एक रोटी दे लंगोटी द्वार तेरा पावूं ।
काम क्रोध छोडकर हरिगुण गाऊं ॥२॥
मेहेरबान मेहेरबान मेहेर करो मेरी ।
दास कबीर चरण खडा नजर देख तेरी ॥३॥
भजन -
बेळगांव शहरी अनगोळमाळी श्रीहरिमंदिरात
तेथे हरि प्रत्यक्ष नांदतो काय सांगू मात ॥१॥
हरिनामाचा गजर होतो तेथे दिनरात ।
बंधुभगिनी सर्व मिळोनि अमोघ लाभ घेत ॥२॥
आमुचा हरि कृपादृष्टीने आम्हाकडे पहात ।
पाप ताप दुःख संकटे हरिला भिउनि पळत ॥३॥
८) माझी
देवपूजा देवपूजा । पाय तुझे गुरुराजा ॥१॥गुरुचरणाची माती । तीच माझी भागीरथी ॥२॥
गुरुचरणाचा बिंदु । तोचि माझा क्षीरसिंधु ॥३॥
गुरुचरणाचे ध्यान । तेचि माझे संध्या - स्नान ॥४॥
शिवदिन केसरिपायी । सदगुरुवाचुनि दैवत नाही ॥५॥
भजन - सदगुरुमाय दाखवि पाय । तुजविण गमेना करु मी काय ॥
अर्जी
गुरुराया तव चरणदास मी अर्जी ऐकावी । दयाळा, अर्जी ऐकावी ॥धृ०॥मी अनाथ मज सनाथ करुनि लज्जा रक्षावी ।
दयाळा, उपेक्षा नसावी । चाल ।
तवपदकमली अनन्यभक्ति सतत दृढसावी ।
दयाळा, सतत दृढसावी ॥१॥
विषयसुखाची इच्छा कदापि न मला स्पर्शावी ।
दयाळा, न मला स्पर्शावी ।
तव दिव्य ज्ञान बोधामृती मम मति घर्षावी ।
दयाळा, मम मति घर्षावी । चाल ।
तुजवाचुनिया अन्य दैवते कधी नच नवसावी ।
दयाळा, कधी नच नवसावी ॥२॥
मी माझे ही द्वैतबुद्धि स्वप्नी न वसावी ।
दयाळा, स्वप्नी न वसावी ।
स्वस्वरुपाचा अनुभव देउनि भ्रांति निरसावी ।
दयाळा, भ्रांति निरसावी । चाल ।
कलिमलदहना परमपावना तव कृपा ऐसावी ।
दयाळा, तव कृपा ऐसावी ॥३॥
भजन - जय जय पांडुरंग हरि ॥
आरती
१) आरती अनंता जय जय । आरती अनंता ॥धृ०॥अनंत तव रुप, अनंत तव गुण । विधिहरिहरताता ॥१॥
अनंत तव नाम, अनंत तव प्रेम । तूचि कर्ताहर्ता ॥२॥
अनंत तव पद, अनंत तव कर । तारिसी तू भक्तां ॥३॥
अनंत श्रवण, अनंत नयन । काळाचा हंता ॥४॥
कलिमलदहना, सगुणनिर्गुणा । तूचि गुरुसमर्था ॥५॥
२) आरती गुरुमाई । मस्तक ठेविते पायी ॥धृ०॥
कलियुगी अवतरोनी । श्रीहरिमंदिरात ।
कलावती या नामे । प्रगटलीस आई ॥१॥
गौरवर्ण काया । सुहास्यवदन ।
शांत मूर्ति पाहता ।मन तल्लीन होई ॥२॥
चतुर्विध भक्त येती । त्यावरि समान प्रीति ।
अज्ञान निरसुनिया । देसी आनंद आई ॥३॥
भवताप निवारोनी । सुखविसी सकला ।
म्हणुनि दीन विजया । शरण आली असे पायी॥४॥
घालीन लोटांगण, वंदीन चरण, डोळ्यांनी पाहीन रुप तुझे ।
प्रेमे आलिंगीन, आनंदे पूजीन, भावे ओवाळीन म्हणे नामा ॥१॥
त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुः सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव ॥२॥
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा, बुध्द्यात्मना वा प्रकृतिस्वभावात।
करोमि यद्यत सकलं परस्म, नारायणायेति समर्पयामि ॥३॥
ॐ चैतन्यं शाश्वतं शांतं व्योमातीतं निरंजनम ।
नादबिंदुकलातीतं तस्मै श्रीगुरुवे नमः । गुरवे नमः । गुरवे नमः ॥
गुरुपादुकाष्टक
दयावंत कृपावंत सद्गुरुराया | अनन्यभावे शरण आलो मी पाया | भवभ्रमातुनि काढी त्वरे या दीनासी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |१|अनंत अपराधी मी सत्य आहे | म्हणोनि तुझा दास होऊ इच्छिताहे | तुजविण हे दुःख सांगू कुणासी |नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |२|
मतिहीन परदेशी मी एक आहे | तुजविण जगी कोणी प्रेमे न पाहे | जननी जनक इष्ट बंधु तू मजसी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |३|
जगतपसारा दिसो सर्व वाव | अखंडीत तव पायी मज देई ठाव | विषापरि विषय वाटो मनासी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |४|
तव आज्ञेसी पाळील जो एकभावे | तयासीच तू भेट देसी स्वभावे | म्हणोनि अनन्यशरण आलो मी तुजसी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |५|
किती दिवस गाऊ हे संसारगाणे | तुजविण कोण हे चुकविल पेणे | नको दूर लोटू चरणी थारा दे मजसी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |६|
सुवार्णासी सोडुनी कांति न राही | सुमनासी न सोडी सुवास पाही| तैसा मी राहीन निरंतर तुझ्या सेवेसी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |७|
कलावंत भगवंत अनंत देवा | मनकामना पुरवि दे अखंड तव भक्तिमेवा | कृपा करोनि मज ठेवी स्वदेशी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |८|
सोमवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु ...
मंगलवार - प्रातः स्मरण - उठा उठा हो वेगेसी ...
मंगलवार - सायंस्मरण - श्री गणपते | विघ्ननाशना ...
बुधवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागर ...
बुधवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई । मजला ठाव द्यावा पायी ...
गुरुवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति कर ...
गुरुवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...
शुक्रवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागरा ...
शुक्रवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...
शनिवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागरा ...
शनिवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...
रविवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागरा ...
रविवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...
Comments
Post a Comment