नित्योपासना - गुरुवार - सायंस्मरण
ॐ नम: शिवाय
![]() |
परमपूज्य आई श्रीकलावतीदेवी |
भजन - सदगुरुनाथे माझे आई । मजला ठाव द्यावा पायी ॥
१) मज मोरयाचा बहुत लागला छंद बाय ॥धृ०॥एक घडी पळ विसरु पडेना । नवल मी आता सांगु काय ॥१॥
असता संसारी सहज उदास । लाधला मोरयाचा पाय ॥२॥
गोसावीनंदन स्वामी परात्पर । सुखमय सर्वांठाय ॥३॥
भजन - पार्वतीच्या नंदना मोरया, गजानना गजवदना ॥
२) श्रीगुरुकृपाअंबे जय जय जय जगदंब आई ॥धृ०॥तनमनधन हे अर्पुनि चरणी । शरण मी आलो दीन होउनि ।
नाम तुझे मम वदनी देउनि । ठेवी पायी । माते ॥१॥
नाम तुझे करी पतितां पावन । कलियुगी नाही त्या समान ।
न करिता व्रत तीर्थे दान । मोक्ष देई । माते ॥२॥
आजवरि रक्षिले बहु भक्तांसी । नासुनि त्यांच्या पापराशी ।
दिधले सुखसाम्राज्यपदासी । वर्णु म्या कायी । माते ॥३॥
तुज विस्मरता अंगी चढे मद । तुजला स्मरता सदा सावध ।
दासी कला तव पदारविंद । नित्य ध्याई माते ॥४॥
भजन - आनंदे गुरुमाय । निजानंदे गुरुमाय । सच्चिदानंदे गुरुमाय । पूर्णानंदे गुरुमाय ॥
३) सखये पाही गुरुवाचुनि दैवत नाही ॥धृ०॥गुरु कार्श रामेश्वर । गुरु गोकर्ण पंढरपूर ।
गुरु तीर्थाचे माहेर । गुरु ते ग बाई ॥गुरु०॥१॥
गुरु प्रेमाचा पाझर । गुरु निजशांतीचे घर ।
गुरु परब्रह्मसागर ॥गुरु०॥२॥
गुरु भक्तीची माउली । गुरु ज्ञानाची साउली ।
गुरुपासुनि मुक्ति मिळाली ॥गुरु०॥३॥
गुरु वशिष्ठ श्रीरामाचे । गुरु याज्ञवल्क्य जनकरायाचे ।
गुरु सांदीपन श्रीकृष्णाचे ॥गुरु॥४॥
गुरु आदिनाथ मच्छिंद्राचे । गुरु मच्छिंदर गोरखाचे ।
गुरु जालिंदर मैनावतीचे ॥गुरु०॥५॥
गुरु नागनाथ बहिरंभटाचे । गुरु गहिनीनाथ निवृत्तीचे ।
गुरु निवृत्ति ज्ञानेशाचे गुरु०॥६॥
गुरु ज्ञानेश्वर विसोबारायाचे । गुरु विसोबाराय नामदेवाचे ।
गुरु नामदेव जनाबाईचे ॥गुरु०॥७॥
गुरु नारायण विधीचे । गुरु ब्रह्मदेव अत्रीचे ।
गुरु अत्रिमुनि दत्तात्रयाचे गुरु०॥८॥
गुरु दत्तात्रय जनार्दनाचे । गुरु जनार्दन एकनाथाचे ।
गुरु रमावल्लभदास आवडाबाईचे ॥गुरु०॥९॥
गुरु विमलानंद शांताईचे । गुरु गजदंड सिद्धारुढाचे ।
गुरु सिद्धारुढ कलावतीचे ॥गुरु०॥१०॥
भजन - शांत किती हा सदगुरुमूर्ति । पाहता मावळे द्वैतभ्रांति ॥
४) मोरी लागी लटक गुरुचरणनकी ॥धृ०॥चरणाबिना मुझे कछु नही भावे । झूट माया सब सपननकी ॥१॥
भवसागर सब सूक गया है । फिकिर नही मुझे तरननकी ॥२॥
मीराके प्रभु गिरिधर नागर । उलट भयी मोरे नयननकी ॥३॥
भजन - सीताराम जय जय राम । हरेराम, राम, राम, राम ॥
५) हा परम सनातन विश्व भरुनि उरला ।गुरुदत्तराज हा ऋषिकुलात अवतरला ॥धृ०॥
स्मितरम्यवदन काषायवसनधारी । पीयूषयुक्त करि रत्नजडित झारी ।
निजभक्तत्राण कारणी शूल धरिला ॥गुरु०॥१॥
बांधिला कोप मुरडुनि जटा मुकुटी ।
घातली दयावनमाला दिव्य कंठी ।
करधृत डमरुतुनि उपजति ज्ञानकला ॥२॥
मृगचर्म पांघरी शंख चक्र हाती ।
श्रुति श्वानरुप होउनि पुढे पळती ।
भूधेनु कलिभये चाटित चरणाला ॥३॥
करि स्वजन उपाधि भस्मलेप अंगा ।
झोळीत भरी तज्जन्ममरणपिंगा ।
नारायण ह्रदयी रंग भरुनि गेला ॥४॥
भजन - उपेंद्रा भक्तचकोरचंद्रा । सत्वरि धाव बा ॥
६) जा शरण गुरुला भव तरशील ॥धृ०॥अस्थिमांसमय तनु मी समजुनि । किती आरशात तू पहाशील ॥१॥
खाणे पीणे निजणे यातचि । व्यर्थ वेळ तू घालशील ॥२॥
विषय विलासी दिननिशी रमसी । परि शेवटी तू फसशील ॥३॥
पुनरपि जनन पुनरपि मरण । किती फेरे तू फिरशील ॥४॥
अंतकाळी तुज कोणी न वाली । हे कळता दुःख पावशील ॥५॥
नित्यानित्यविचार न करिता । शेवटी अनुतापे रडशील ॥६॥
हरिनामामृत सेविसि जरि तू । दुःख समूळ हरशील ॥७॥
संतवचनी दुर्लक्ष करिसि जरी । हाय हाय मग करशील ॥८॥
विषयी विटसी भजनी नटसि जरी । परमपद पावशील ॥९॥
गुरुपदी अनन्यशरण रिघता । ह्रदयग्रंथी तुटतील ॥१०॥
गुरुकरुणोदये भ्रम निवारुनि । आनंदे रमशील ॥११॥
हर्षखेदादि द्वंद्वापासुनि । गुरुबोधे तू सुटशील ॥१२॥
गुरुमहिमा तुज कळल्यावर मग । बोध वरी वरी झेलशील ॥१३॥
रुक्मिणीह्रदयनिवासी प्रभुला । ध्याता कृतकृत्य होशील ॥१४॥
भजन - ॐ नमःशिवाय, तरणोपाय, सुलभ उपाय, तारकमंत्र गुरुंचा ॥
७) आज सखी संतसंगतमे मिलके हरिके गुनगान करो ॥धृ॥कलिमे हरिनाम समान बडो कोई और उपाय नही जगमे ।
सब पापनिवारण कारण है भवतारण है मनमे सुमरो ॥१॥
बिन संतसमागम ज्ञान नही बिन ज्ञान न मोक्ष मिले कबहि
करले तप तीरथ दान घने चहुंधामन बीच भले बिचरो ॥२॥
विश्वचराचरमे परिपूरण चेतन ब्रह्मस्वरुप सदा ।
घटभीतर जान पिछान सही मन बीच निरंतर ध्यान धरो ॥३॥
सब संशय दूर करावत है निजरुप लखावत है तनमे ।
ब्रह्मानंद सुनो गुरुज्ञान सदा भवसागर दुस्तर पार तरो ॥४॥
भजन -
बेळगांव शहरी अनगोळमाळी श्रीहरिमंदिरात
तेथे हरि प्रत्यक्ष नांदतो काय सांगू मात ॥१॥
हरिनामाचा गजर होतो तेथे दिनरात ।
बंधुभगिनी सर्व मिळोनि अमोघ लाभ घेत ॥२॥
आमुचा हरि कृपादृष्टीने आम्हाकडे पहात ।
पाप ताप दुःख संकटे हरिला भिउनि पळत ॥३॥
८) सदगुरुकृपे लाभला हो आजी ब्रह्मानंद ॥धृ०॥चिंता सुटली निश्चिंत झालो । पाहता यशोदानंद ॥१॥
जन्ममरण हर्षखेदादि । तुटले द्वैतबंध ॥२॥
संत सुटला निःसंग झालो । फिरतो आता स्वच्छंद॥३॥
प्रेम घेणे प्रेम देणे । हाचि आमुचा छंद ।
प्रेमसागरी प्रेमलहरी । उठती अनिर्बंध ॥५॥
दिसते उपाधि परी ती नसते । सदा प्रेमामाजि धुंद ॥६॥
कलिमलदहन भजनी रमता । आटला विषयानंद ॥७॥
भजन - सदगुरुमाय दाखवि पाय । तुजविण गमेना करु मी काय ॥
अर्जी
गुरुराया तव चरणदास मी अर्जी ऐकावी । दयाळा, अर्जी ऐकावी ॥धृ०॥मी अनाथ मज सनाथ करुनि लज्जा रक्षावी ।
दयाळा, उपेक्षा नसावी । चाल ।
तवपदकमली अनन्यभक्ति सतत दृढसावी ।
दयाळा, सतत दृढसावी ॥१॥
विषयसुखाची इच्छा कदापि न मला स्पर्शावी ।
दयाळा, न मला स्पर्शावी ।
तव दिव्य ज्ञान बोधामृती मम मति घर्षावी ।
दयाळा, मम मति घर्षावी । चाल ।
तुजवाचुनिया अन्य दैवते कधी नच नवसावी ।
दयाळा, कधी नच नवसावी ॥२॥
मी माझे ही द्वैतबुद्धि स्वप्नी न वसावी ।
दयाळा, स्वप्नी न वसावी ।
स्वस्वरुपाचा अनुभव देउनि भ्रांति निरसावी ।
दयाळा, भ्रांति निरसावी । चाल ।
कलिमलदहना परमपावना तव कृपा ऐसावी ।
दयाळा, तव कृपा ऐसावी ॥३॥
भजन - जय जय पांडुरंग हरि ॥
आरती
१) आरती अनंता जय जय । आरती अनंता ॥धृ०॥अनंत तव रुप, अनंत तव गुण । विधिहरिहरताता ॥१॥
अनंत तव नाम, अनंत तव प्रेम । तूचि कर्ताहर्ता ॥२॥
अनंत तव पद, अनंत तव कर । तारिसी तू भक्तां ॥३॥
अनंत श्रवण, अनंत नयन । काळाचा हंता ॥४॥
कलिमलदहना, सगुणनिर्गुणा । तूचि गुरुसमर्था ॥५॥
२) आरती गुरुमाई । मस्तक ठेविते पायी ॥धृ०॥
कलियुगी अवतरोनी । श्रीहरिमंदिरात ।
कलावती या नामे । प्रगटलीस आई ॥१॥
गौरवर्ण काया । सुहास्यवदन ।
शांत मूर्ति पाहता ।मन तल्लीन होई ॥२॥
चतुर्विध भक्त येती । त्यावरि समान प्रीति ।
अज्ञान निरसुनिया । देसी आनंद आई ॥३॥
भवताप निवारोनी । सुखविसी सकला ।
म्हणुनि दीन विजया । शरण आली असे पायी॥४॥
घालीन लोटांगण, वंदीन चरण, डोळ्यांनी पाहीन रुप तुझे ।
प्रेमे आलिंगीन, आनंदे पूजीन, भावे ओवाळीन म्हणे नामा ॥१॥
त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुः सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव ॥२॥
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा, बुध्द्यात्मना वा प्रकृतिस्वभावात।
करोमि यद्यत सकलं परस्म, नारायणायेति समर्पयामि ॥३॥
ॐ चैतन्यं शाश्वतं शांतं व्योमातीतं निरंजनम ।
नादबिंदुकलातीतं तस्मै श्रीगुरुवे नमः । गुरवे नमः । गुरवे नमः ॥
गुरुपादुकाष्टक
दयावंत कृपावंत सद्गुरुराया | अनन्यभावे शरण आलो मी पाया | भवभ्रमातुनि काढी त्वरे या दीनासी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |१|अनंत अपराधी मी सत्य आहे | म्हणोनि तुझा दास होऊ इच्छिताहे | तुजविण हे दुःख सांगू कुणासी |नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |२|
मतिहीन परदेशी मी एक आहे | तुजविण जगी कोणी प्रेमे न पाहे | जननी जनक इष्ट बंधु तू मजसी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |३|
जगतपसारा दिसो सर्व वाव | अखंडीत तव पायी मज देई ठाव | विषापरि विषय वाटो मनासी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |४|
तव आज्ञेसी पाळील जो एकभावे | तयासीच तू भेट देसी स्वभावे | म्हणोनि अनन्यशरण आलो मी तुजसी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |५|
किती दिवस गाऊ हे संसारगाणे | तुजविण कोण हे चुकविल पेणे | नको दूर लोटू चरणी थारा दे मजसी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |६|
सुवार्णासी सोडुनी कांति न राही | सुमनासी न सोडी सुवास पाही| तैसा मी राहीन निरंतर तुझ्या सेवेसी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |७|
कलावंत भगवंत अनंत देवा | मनकामना पुरवि दे अखंड तव भक्तिमेवा | कृपा करोनि मज ठेवी स्वदेशी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |८|
सोमवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु ...
सोमवार - सायंकाल स्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...
मंगलवार - प्रातः स्मरण - उठा उठा हो वेगेसी ...
मंगलवार - सायंस्मरण - श्री गणपते | विघ्ननाशना ...
बुधवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागर ...
बुधवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई । मजला ठाव द्यावा पायी ...
गुरुवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति कर ...
शुक्रवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागरा ...
शुक्रवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...
शनिवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागरा ...
शनिवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...
रविवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागरा ...
रविवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...
Comments
Post a Comment